ना.चंद्रकांत पाटील यांनी.... निवेदन घेतले, ऐकून घेतले नाही !

पंढरपूर (प्रतिनिधी) ः - चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपश्यामुळे पडलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यूमुखी पडलेल्या चार बालकांच्या कुटुंबियास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल असे आश्‍वासन प्रत्यक्ष विधानसभेत दिले गेले होते. मात्र पंढरपूर तहसिल कार्यालयाकडून चुकीचा अहवाल पाठविण्यात आल्यामुळे दुर्घटनाग्रस्त कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित राहिले होते. या कुटुंबास शासनाकडून जाहीर झालेली मदत तात्काळ देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. मात्र याबाबत काहीही ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती नसल्याचेच दिसून आले असून त्यामुळे आता न्यायालयीन लढा लढण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचे दिसून येत आहे. तर त्या ‘चार’ बालकांच्या मृत्यूनंतरही चंद्रभागेत अवैध वाळू उपश्यामुळे खड्डे पडतात हे मान्यच करायला येथील तहसिल कार्यालय नकार देत असल्याचे त्यांनी या घटनेबाबत तयार केलेल्या दुरूस्ती अहवालामधून दिसून येत आहे. त्याबाबतही माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, ना.चंद्रकांत पाटील यांनी ऐकून घेण्यास नकार दिल्याचे दिसून आले. पंढरपूर तहसिल कार्यालयाकडून दुरूस्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालया कडे पाठविण्यात आला असून आता याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे. कोळी युवा महासंघाचे अध्यक्ष बबलू बोराळकर यां
नी याच मागणीसाठी तहसिल कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर आ.भालके यांनी उपोषण स्थळास भेट देवून थेट जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली होती. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दुरूस्त अहवाल येताच तात्काळ मदत दिली जाईल असे आश्‍वासन दिले होते. मात्र अजूनही याबाबत कुठली कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे आता आम्हास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा बबलू बोराळकर यांनी दिला आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव