राज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे
राज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे
पंढरपूर दि. 31 :- राज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे, असे साकडे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेच्या वेळी श्री विठ्ठल चरणी घातले.
पंढरपूर येथे कार्तिक एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापुजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. शासकीय महापुजेस महसूल मंत्री श्री. पाटील यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कर्नाटक राज्यातील विजापूर तालुक्यातील हडगल्ली येथील बळीराम शेवू चव्हाण (वय 40 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी शिनाबाई बळीराव चव्हाण (वय 35 वर्षे) या वारकरी दांपत्याला मिळाला.
शासकीय महापुजेनंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात महसूल मंत्री पाटील बोलत होते. समारंभास मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, श्रीकांत भारतीय उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील शासन हे सामान्य नागरिकांचे शासन आहे. सामान्य नागरीक, शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्या हिताला नेहमीच शासनाने प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना त्याच्या पायावर भक्कमपणे उभे करणे, त्याच्या जीवनात आर्थिक् स्थैर्य मिळवून देणे आणि त्यांच्या शेतीची उत्पादक क्षमता वाढविण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात असल्याचेही महसूलमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
महसूल मंत्री म्हणाले, पंढरपुरात वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येत असतो. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्याला जे समाधान मिळते त्याच प्रकारचे समाधान त्याला पंढरपूर येथील व्यवस्था, स्वच्छता पाहून मिळावे. यासाठी राज्य शासनाने निर्मलवारीच्या उपक्रमातून प्रयत्न सुरु केले आहेत. यातून चंद्रभागा नदी स्वच्छता, वाळवंट स्वच्छता, नमामी चंद्रभागा सारखे उपक्रम राबविले जात आहेत. पंढरपूरच्या मंदिर समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून महसूल मंत्री म्हणाले, भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, मंदिर व परिसरातील स्वच्छता विषयक काम, पंढरपूर शहरातील शौचालये या कामात घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असाच आहे.
पंढरपूर हे पवित्र शहर आहे. येथे येणाऱ्या भाविक भक्ताला चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी आणि शहर व वाळवंटात वीज उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. मंदिर समितीने सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढे यावे. देशातील, राज्यातील अन्य मंदिर समितीमार्फत जसे उपक्रम राबविले जातात तसेच उपक्रम पंढरपुरात राबविण्यास प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा महसूल मंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली. शासनाने पंढरपूरच्या मंदिर समितीमध्ये सह अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मंदिर समितीचे काम अधिक गतीने व चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या समारंभात मानाचे वारकरी दापंत्य श्री. व सौ. चव्हाण यांचा सत्कार तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत देण्यात येणारा मोफत एस.टी. पास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच मंदिर समितीमार्फत समितीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचे वितरण आणि वारकरी भाविकांसाठी समितीमार्फत नव्याने सुरु करण्यात आलेल्या दर्शन टोकन पासचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात मंदिर समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली.
समारंभास माजी मंत्री बबनराव पाचपुते, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, मंदिर समितीचे सदस्य औसेकर व श्रीमती नडगिरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व भाविक उपस्थित होते.