पंढरी वार्ता :- मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व अनन्यसाधारण - प्राचार्य मिलिंद परिचारक
"मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व हे अमूल्य आणि अनन्यसाधारण आहे. साहित्यिक हे एखाद्या सामान्य गोष्टीला असामान्य बनवितात. म्हणून अशी साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्य कृतीस पुरस्कार देऊन सन्मानित करणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पाठीवर प्रोत्साहक थाप टाकणेच आहे. " असे मत येथील उमा महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद परिचारक यांनी व्यक्त केले. ते येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या वतीने देण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.
या वर्षीपासून परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या प्रथमच देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी मंगळवेढा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शशिकांत जाधव यांच्या 'दु:खितांचे अश्रू' या कादंबरीस 'शब्द परिमल पुरस्कार', गोमेवाडी तालुका आटपाडी येथील गझलकार सुधीर इनामदार यांच्या 'इजांची मखमल' या गझल संग्रहास 'काव्य परिमल पुरस्कार', पंढरपूर येथील कथाकार सुजितकुमार कांबळे यांच्या 'टोळकं' या कथासंग्रहास 'कथा परिमल पुरस्कार' पंढरपूर येथील युवा साहित्यिक उमेश सासवडकर यांच्या 'वाटेत भेटलेली माणसं' या ललित लेख संग्रहास 'ललित परिमल पुरस्कार', मोहोळ येथील साहित्यिक दत्तात्रय चव्हाण यांना अविरत साहित्य सेवेबद्दल 'साहित्य सेवा परिमल पुरस्कार' आणि पंढरपूर येथील कवी अमर कांबळे यांच्या 'आईच्या रक्ताची जाणीव' या काव्यसंग्रहास 'साहित्य उदय पुरस्कार' मा. मिलिंद परिचारक, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक मा प्राचार्य शिवाजीराव बागल, सुप्रसिद्ध कवयित्री सौ. वंदनाताई कुलकर्णी, विश्वविक्रमवीर साहित्यिक रवि वसंत सोनार आणि कवी सचिन कुलकर्णी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते प्रदान करण्यात आले .
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना सौ वंदनाताई कुलकर्णी म्हणाल्या "साहित्यामध्ये मानवी जीवन सकारात्मक व सुंदर करण्याचे सामर्थ्य आहे. आणि अशा साहित्यिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यकच आहे." तर प्राचार्य शिवाजीराव बागल आपल्या खुमासदार शैलीत बोलताना म्हणाले "माणसाची व्यथा आणि वेदना ही साहित्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचते. त्यामुळे वेदनांवर उपाय सापडू शकतो."
रविवार दिनांक २४ डिसेंबर, २०१७ रोजी हॉटेल विठ्ठल इन येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार समारंभात कवी दादासाहेब खरात, रावसाहेब साठे, प्रथमेश काळे, प्रगती काळे, संग्राम जाधव, किरण घोडके, कवयित्री सौ संगीताताई मासाळ, सौ योगीणीताई ताठे या निमंत्रित कवींचे रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे कविसंमेलन कवी राजेंद्र झुंबर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक परिमलचे अध्यक्ष कवी सचिन कुलकर्णी यांनी केले. आपल्या प्रवाही, श्रवणीय आणि ओघवत्या शैलीत नेटके व सुव्यवस्थित सूत्रसंचालन सौ. रेखा चंद्रराव आणि सौ सविता दुधभाते यांनी केले. तर आभार कवी राजेंद्र झुंबर भोसले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या वतीने विशेष परिश्रम करण्यात आले.
