पंढरी वार्ता :-भुयारी गटार योजना टप्पा क्र. 3 चे काम मजिप्राला द्या ! भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.


मुख्यमंत्र्यांनी मोकळ्या मनाने पंढरपूर नगरपरिषदेला आठ रस्त्यांच्या कामासाठी 52 कोटी रूपये दिले. या कामाचा दर्जा व कामाची प्रतवारी विचारात घेता पंढरपूर शहराच्या भुयारी गटार योजना टप्पा क्र. 3 साठी देण्यात येणारा 65 कोटी रूपयांचा निधी हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देऊन मजिप्रा मार्फत शहरातील टप्पा क्र. 3 चे काम करावे, अशी मागणी पंढरपूर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पंढरपूर शहरातील इसबावी, दूध डेअरी परिसर, डाक बंगला परिसर, टाकळी रोड, कोर्टी रोड, भगवान नगर, एमएसईबी परिसर व शहरातील ड्रेनेजपासून वंचित असलेला इतर भागामध्ये ड्रेनेज लाईन व्हावी, ही अनेक दिवसांपासूनची पंढरपूरकरांची मागणी होती. या मागणीस अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 65 कोटी रूपयांचा निधी पंढरपूर शहराच्या भुयारी गटार योजना टप्पा क्र. 3 साठी देण्याची तयारी दर्शविली आहे.
ही 65 कोटी रूपयांची रक्कम 31 मार्च 2018 पूर्वी दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सदरची रक्कम ही पंढरपूर नगरपालिकेला न देता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग करून टप्पा क्र. 3 चे काम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करून घ्यावे, अशा आशयाचे पत्र पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 180 कोटी रूपये रस्त्यांसाठी मंजूर केले आहेत. त्यापैकी 52 कोटी रूपये 8 रस्त्यांसाठी पंढरपूर नगरपालिकेला देऊ केले आहेत. मात्र पंढरपूर नगरपालिकेकडे असलेला कर्मचारी वर्ग, तांत्रिक क्षमता नसलेला अभियंत्यांचा वर्ग, त्याचा विचार करता रस्त्याच्या कामाची वाताहात होऊ लागली आहे. त्यामुळे हा 52 कोटी रूपयांचा निधी अक्षरश: ठेकेदार व अधिकारी मिळून मिसळून लुटमार करू लागले आहेत.
हीच परिस्थिती भुयारी गटार योजना टप्पा क्र. 3 बाबत होऊ नये या योजनेसाठी देण्यात येणारे 65 कोटी रूपये ही रक्कम थोडीथोडकी नसून या रक्कमेचा उपयोग खर्‍या अर्थाने पंढरपूर उपनगरात ड्रेनेज नसलेल्या भागासाठी केला जावा, त्याकरीता सदरची रक्कम ही पंढरपूर नगरपालिकेला न देता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करावी, अशा आशयाची मागणी करणारे निवेदन पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दिले आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव