पंढरी वार्ता:- बाधीत मिळकतदारांवर अन्याय दूर करा अन्यथा उग्र आंदोलन छेडू ! शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणचा इशारा
भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण रुंदीकरण : -
पंढरपूर शहरातील भजनदास चौक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याचे रुंदीकरणाबाबत या परिसरातील बाधीत होणार्या मिळकतदारंाना नुकसान भरपाईची रक्कम स्विकारण्याबाबतच्या नोटीसा आलेल्या आहेत. मात्र या नोटीसीत नमूद करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम आम्हास मान्य नसून वास्तविक पाहता शहरातील या प्रमुख रस्त्यावर असलेल्या मालमत्तांचे बाजारमुल्य खुप मोठे आहे.असे असताना जुन्याच दरानुसार मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.या नोटीसा पंधरा दिवस मुदतीच्या असून 22 डिसेंबर रोजीची तारीख असलेल्या या नोटीसा मुदत उलटून गेल्यानंतर 17 जानेवारी रोजी बजावण्यात आलेल्या आहेत.या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधीत मिळकतदारांवर मोठा अन्याय होत असून हा अन्याय दूर केल्याशिवाय आम्ही विटही पडू देणार नाही असा इशारा शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणच्या वतीने येथील प्रांत कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
तसेच हा रस्ता 9 मिटर रुंदीकरण करण्याचे मुळ विकास आराखडयात प्रस्तावित करण्यात आले होते.मात्र आता हा रस्ता 12 मिटर रुंदीकरण करण्याचा घाट घातला गेला आहे.वास्तविक पाहता चार प्रमुख यात्राचा कालावधी वगळता या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा ताण नसतो.एरव्ही हा रस्ता रिकामा पडलेला असतो.असे असताना 12 मिटर एवढया मोठया प्रमाणात रुंदीकरणाची आवश्यकता नाही.तसेच प्रस्तावित करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कमही अन्यायकारक आहे.रस्ता रुंदीकरणाचे काम अन्यायकारक पध्दतीने होऊ नये यासाठी हे निवेदन देण्यात देण्यात आले आहे.मात्र याची दखल न घेतल्यास शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातूून उग्र आंदोलन छेडेल असा इशारा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी दिला आहे.
हे निवेदन देताना प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष रघू पवार,किरण शहा,रविंद्र कोळी,सुधीर शिवशरण,प्रशांत गायकवाड,राहूल कोतमीरे,पांडुरंग डोंगरे,सोमनाथ अभंगराव,शहाजी शिंदे,ह.भ.प.चवरे महाराज,नरसिंह जाधव,भास्कर धनवडे,प्रसाद व्यवहारे,बुवा पाटोळे,सुरज भोसले यांच्यासह या भागातील बाधीत मिळकदार व प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.
