पंढरी वार्ता :- स्पर्धा परीक्षा क्लासेस येणार कायद्याच्या कचाट्यात !
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात सर्वाधिक गर्दी सध्या स्पर्धा परीक्षा क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. त्या तुलनेत खासगी क्लासेस व गल्लोगल्ली सुरू
झालेल्या अभ्यासिका यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मात्र, आता यावर नियंत्रण येणे गरजेचे असल्याने शासनाकडून आता खासगी क्लासेस संदर्भातील कायद्यात स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचाही समावेश करण्याचा विचार सुरू आहे.
राज्यात सध्या एखाद्या सरकारी जागेच्या परीक्षेसाठी लाखोने अर्ज येतात. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना राज्यभरातून बसतात. यामुळेच राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र, क्लासेस, अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. यामध्ये काही क्लासेसची राज्यभर केंद्रे आहेत. याही क्लासेससाठी कोणतीही नियमावली नाही. याबाबत सध्याच्या खासगी क्लासच्या समितीतील क्लासचालकांनी प्रश्न उपस्थित केला की जर हा कायदा आम्हाला लागू होऊ शकतो तर तो बारावी पुढील शिक्षण घेणाऱ्यांसाठी का नाही? हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता शासनाने बारावीनंतरच्या क्लासचाही यामध्ये विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच खासगी क्लास कोणाला म्हणावे, त्यामध्ये चित्रकला, तबला अशा क्लासेसचा समावेश करावा का, स्पर्धा परीक्षांच्या क्लासला देखील कायद्याखाली आणावे का याबाबत पुढील बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले आहे
.
.
