पंढरी वार्ता:- नोटरीद्वारे केलेले भाडेकरार अडचणीत ! कायदेशीर कारवाईचे मुंद्रांक जिल्हाधिकार्यांचे आदेश
जिल्ह्यात अनोंदणीकृत नोटरी करुन केलेल्या भाडेकराची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात भाडेकराराने राहत असलेल्या व्यक्तींनी महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 नुसार भाडेकराची नोंदणी करावी, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त परराज्यातून, इतर शहरातून, इतर जिल्ह्यातून आलेले लाखो नागरिक भाड्याने वास्तव्यास आहेत. त्यांना महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 नुसार भाडेकराराची नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. तसेच नागरिकांनी त्यांच्या दुकान, घर अथवा इमारतीमध्ये ठेवलेल्या भाडेकरुंची संपर्ण माहिती पोलीसांना देणे बंधनकारक केले आहे. हा भाडेकरार वाहन परवाना, वाहन खरेदीसह अन्य आवश्यक कामांसाठी रहिवासी पुरावा म्हणूनही ग्राह्य धरला जातो.
पोलीस ठाण्यामध्ये पडताळणीसाठी दाखल केलेल्या करारांपैकी केवळ नोंदणीकृत दस्तांवर योग्य मुद्रांक शुल्क लावलेले असते मात्र काही दस्त अनोंदणीकृत, केवळ नोटरी केलेले असतात. त्यामुळे पडताळणी दरम्यान नागरिकांकडे नोंदणीकृत भाडेकरार आणण्याबाबत आग्रह धरण्यात यावा जेणेकरुन शासकीय महसूलाचे नुकसान होणार नाही. पोलीस आयुक्त, सोलापूर व पोलीस अधिक्षक, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना साध्या पध्दतीने केले जाणारे करार नोंदणीकृत आहेत का, ते तपासण्याबाबात सूचना देण्यात यावेत अशी विनंती पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक सोलापूर यांना करण्यात आलेली आहे.
सोलापूर शहरामध्ये सर्रासपणे मुद्रांक व साध्या कागदावर भाडेकरार करुन नोटरी केली जाते. भाडेकरारांची नोंदणी करण्यासाठी ई रजिस्ट्रेशन सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे देऊनही भाडेकरार नोंदणीकृत केली जात नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर शासनाचे महसूली उत्पन्न बुडत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जागा, दुकान, गाळा वा इतर स्थावर मिळकती संबंधी भाडेकरार दस्त नोंदणीकृत करण्यात यावे अन्यथा नियमानूसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सह जिल्हा निबंधक वर्ग – 1, तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
