पंढरी वार्ता:- चंद्रभागा प्रदुषणमुक्त केव्हा करणार? आ.दत्तात्रय सावंत यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला प्रश्‍न

पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची तहान भागविणारी भीमा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. वारक-यांचे दैवत असलेली ही भीमा अर्थात, चंद्रभागा नदी कारखान्यांनी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. याच नदीच्या काठावर भीमाशंकर, सिद्धटेक, गंगापूर आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आहेत. भाविक हेच पाणी तीर्थ म्हणून पितात. एकीकडे गंगेच्या शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू असतानाच लाखो वारक-यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागेकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नमामी चंद्रभागे योजनेची घोषणा करून वर्ष होत आले तरी तुळशी वनाचे प्रगतीपथावर असलेले काम सोडले तर हे काम पुढे सरकू शकले नाही.यातच भरीस भर म्हणून चंद्रभागेतून रात्रभर होत असलेला अवैध वाळू उपसा नदीच्या पात्रालाच धोका उत्पन्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या अतिप्रदूषित 302 नद्यांमध्ये मुळा-मुठेचा समावेश आहे. नागरी वस्त्यांतून निर्माण होणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, निचरा होणारे लिचेट, वाळू उपसा, नदीत पाणी नसणे, जलपर्णीची वाढ, गाळाचे प्रमाण ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. पुणे शहरात दररोज 744 दशलक्ष लिटर्स एवढे सांडपाणी तयार होते. यापैकी सुमारे 70 टक्के पाण्यावर नऊ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमधून प्रकिया केली जाते व ते पाणी नदीत सोडले जाते. प्रकिया न केलेले 30 टक्के सांडपाणी मात्र तसेच्या तसे प्रवाहात सोडण्यात येते त्यामुळे चंद्रभागेच्या प्रदुषणाचा स्तर दिवसोंदिवस अतिशय खराब होत आहे.चंद्रभागेच्या प्रदुषणाची गंभीर दखल घेत आमदार दत्तात्रय सावंत यांनी हा विषय विधानपरिषदेत उपस्थित केला असून चंद्रभागा नदी प्रदुषण मुक्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव