पंढरी वार्ता :- भय इथले संपत नाही ! पंढरीत नगर सेवक संदीप पवार यांच्यावर खुनी हल्ला ! ऐन वर्दळीच्या ठिकाणी हॉटेलात घुसून गोळीबार व कोयत्याने वार !

पंढरपूर नगर पालीकेचे नगरसेवक संदीप पवार यांच्यावर येथील स्टेशन रोड परिसरातील हॉटेल श्रीराम येथे ऐन गर्दीच्या वेळी चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार व कोयत्याने वार करीत खुनी हल्ला केला आहे.या हल्ल्यात संदीप पवार हे गंभीर जख्मी झाले असून त्यांना तातडीने येथील ऍपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची परिस्थीती आणखी गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.
           पोलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार नगरसेवक संदीप पवार हे येथील हॉटेल श्रीराम येथे नेहमीच्या मित्रांबरोबर नेहमीच्या टेबलवर गप्पा मारीत चहा पीत असतानाच चेहर्‍यावर काळे कापड गुंडाळलेले चार पाच हल्लेखोर या हॉटेलात घुसले.आल्या आल्या त्यांनी थेट गोळीबार करुन संदीप पवार यांना जबर जख्मी केल्यानंतर पुन्हा सोबत आणलेल्या कोयत्याने वार केले.यावेळी संदीप पवार यांनी हॉटेलच्या बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी आणखी वार केल्याने ते जागेवरच कोसळले.
       या घटनेनंतर पंढरपूरात पुन्हा भीतीचे वातरावरण निर्माण झाले आहे. रविवारी गुढी पाडवा आल्याने पंढरीत आज भाविकांची प्रचंड वर्दळ असतानाच भरदुपारी घडलेल्या या घटनेनंतर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यात आली.या घटनेची माहीती मिळताच पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे,पोलीस निरिक्षक  विठ्ठल दबडे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. या बाबत मिळालेल्या अधिक माहीती नुसार हल्लेखोर हे दुचाकीवर आलेले होते.व त्यांनी हल्ला करुन जाताना एक दुचाकी जागेवरच सोडून गेल्याचा संशय आहे.त्याच बरोबर काही रक्ताचे डाग असलेले कोयतेही सापडले असून ते याच प्रकरणात वापरण्यात आलेत का याचाही पोलीस तपास करीत आहेत.त्याच बरोबर तपासात मिळालेल्या प्राथमिक माहीती नुसार विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पहात आहेत.
      पंढरीस गेल्या चार दशकापासून टोळी युध्दाचा कलंक लागलेला असून पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी आजचे हे प्रकरणही पुर्ववैमन्यासतून घडले असावे अशी शंका व्यक्त केली आहे.या घटनेनंतर पंढरीत सातत्याने होणार्‍या गुन्हेगारीच्या व टोळीयुध्दाच्या घटनांबाबत सामान्य नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असली तरी येथील बहुतांश प्रकरणात आपसातील वैमनस्यच कारणीभूत असल्याने सामान्य नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही अशीही प्रतिक्रिया सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव