पंढरी वार्ता:- ‘त्या’ वादग्रस्त ठरावामुळे मंदीर समितीवर सोशल मिडीयातून टिकेची झोड ! अनेक नागरिकांकडून दारुबंदीचे समर्थन तर मांस विक्री बंदीस कडाडून विरोध ! वारकरी पाईक संघाने केला खुलासा. दारुबंदीबाबत ठाम तर उंबर्‍याच्या आतील मांसाहारास आक्षेप नाही !

विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने वारकरी पाईक संघाच्या निवेदनाची दखल घेत पंढरपूर शहरात दारु विक्री बंदी व सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर मांस विक्रीस बंदी करावी असा ठराव मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करून हा ठराव शासनाकडे पाठीवणार असल्याची घोषणा केली आहे.मात्र समितीने अशा प्रकारचा ठराव केल्याचे वृत्त प्रकाशित होताच पंढरपूरात खळबळ उडाली आहे. मंदीर समितीने आमच्या ताटात पडलेली गाढवे आधी काढावीत नंतर आमच्या ताटात काय आहे याकडे लक्ष द्यावे अशी टिका नेटिझन्स कडून सोशल मिडीयावर होत आहे. मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी या ठरावाबाबत स्थानिक जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणे अपेक्षीत असताना ते याबाबत मौन बाळगून या महत्वपुर्ण ठरावाचे खापर दुसर्‍या कुणाच्या तरी माथ्यावर फोडू पहात आहेत अशीही चर्चा सद्या शहरात सुरु आहे व त्यामुळेच समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर हे प्रसार माध्यमांसमोर या ठरावाचे समर्थन करीत असताना मंदीर समितीचे अध्यक्ष या ठरावाबाबत चकार शब्द बोलत नाहीत अशा प्रतिक्रिया मांसविक्रीस कडाडून विरोध करणारे स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
   दरम्यान आज वारकरी पाईक संघाकडून सोशल मिडीयावर होणार्‍या टिकेची दखल घेत सोशल मिडीयावरच या निवेदनाबाबत खुलास केला असून तो पुढील प्रमाणे आहे.
    नम्र आवाहन
  सर्व पंढरपूरकर नागरिकांना वारकरी संप्रदाय पाईक संघाचे वतीने  नम्र आवाहन करण्यात येत आहे कि नुकतेच वारकरी संप्रदायाच्या वतीने पंढरपूर शहर हे मद्य मांस विक्री मुक्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे . या बद्दल काही गैरसमज पसरवले जात आहेत याकडे दुर्लक्ष करून वस्तुस्थिती लक्षात घ्यावी   हि कळकळीची विनंती आपणास करत आहोत .      
        देशभरातून येणार्या लाखो वारकरी भाविक हे पंढरी क्षेत्राकडे   ऐका पंढरीचे महिमान ।राऊळ तितूके प्रमाण ।तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे ॥ अशा संतवर्णना प्रमाणे पाहतात . श्रीविठ्ठलाच्या दर्शनानंतर पवित्र पंढरपूर चे दर्शन त्याना घडणे आवश्यक असते मात्र तसे न दिसता सगळीकडे मद्य, मांस विक्री होताना पाहून भाविकांना अत्यंत वाईट वाटते. या  भक्तांच्या भावना लक्षात घेऊन विठ्ठलाच्या दर्शनानंतर एक पवित्र पंढरपूर चे दर्शन घडावे या हेतूने या शहरात असणारी मद्य मांस विक्री ची व्यवस्था शहराच्या बाहेर करण्यात यावी जेणेकरून भाविकांच्या श्रद्धेला कुठेही ठेच पोहचणार नाही.
  मात्र या निवेदनाचा  यत्किंचतही उद्देश कुणाच्याही खाण्यावर बंधन आणण्याचा नाही .तसेच मद्य मांस विक्री वर उपजिवीका असणार्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा हि नाही. कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही त्यावर बंधन आणू इच्छित नाही. फक्त याची विक्री राजरोसपणे उघड्यावर लाखो भाविकांच्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी करणे आपल्याला कितपत शोभनीय आहे ? आज हजारो पंढरपूर करांची उपजीविका येणार्‍या भाविकांवर अवलंबून आहे. त्या भाविकांना हे क्षेत्र पावित्र्याचा अनुभव करुन देणारे बनवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्यच आहे. या करिता फक्त मद्य मांस विक्री शहराच्या बाहेर केली जावी एवढीच_मागणी_आहे .
तरी या मागणीकडे कोणत्याही गैरसमजातून न बघता शहरवासिय व भाविक या दोघांचा विचार करून केलेला प्रयत्न म्हणून पहावे हि अपेक्षा .
   रामकृष्ण हरि!
                                  वारकरी संप्रदाय पाईक संघ!

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव