पंढरी वार्ता:-‘ रेनी’सिझनला केवळ 20 दिवसांचा अवधी तर आषाढी यात्रेच्या वर्दळीस 40 दिवस बाकी ! कामांची ‘गडबड’ टाळण्यासाठी आतापासूनच नियोजनाची गरज !

पंढरी वार्ता विशेष:-

        महाराष्ट्रात पूर्वी कालनिर्णय आणि महालक्ष्मी कॅलेंडर तसेच दाते पंचांग या तीनच दिनदर्शिका प्रकाशित होत होत्या. कुठली तिथी, वार, सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी कुठल्या महिन्यात किती तारखेला आहे याची तपशिलवार माहिती या कॅलेंडरमधून जनतेला मिळत होती. मात्र आता गावागणिक शेकडोनी कॅलेंडर निघत असताना आषाढी एकादशी किती तारखेला आहे? हे आषाढी यात्रेचे नियोजन करणार्‍या व या नियोजनास आपत्ती व्यवस्थापनाचे गोंडस नाव देणार्‍या प्रशासनास फक्त एक महिना आधीच समजते की काय? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.
तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली गेल्या जवळपास आठ वर्षांपासून पंढरपूर शहरासाठी कोट्यावधी नव्हे तर अब्जावधी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात येत आहे. या माध्यमातून पंढरपूर शहरात भाविकांच्या समस्या लक्षात घेवून विकास कामे होणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असूनही अनेक कामे रखडलेली दिसून येतात. मात्र आषाढी यात्रा एक-दिड महिन्यावर आल्यावर अगदी मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी होत असल्याचे  अनेकवेळा निदर्शनास आले आहे.
आषाढी यात्रेपुर्वी पालखी मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण  व मुुरमीकरणाची कामे  केली जातात.मात्र ऐन पावसाळ्यात ही कामे केली जात असल्याने एक मोठा पाऊस झाला तरी  या कामांचे अस्तित्वही उरत नाही.  रेनी सिझन म्हणजेच पावसाळ्याच्या  कालावधीत विशिष्ट कामे करण्याबाबत अनेक निर्बंध शासनाने घातले आहेत. मात्र आषाढी यात्रा नियोजनाच्या व आपत्ती व्यवस्थापनाच्या  नावाखाली त्याकडे करीत कोटयावधी रुपये खर्चाची विविध कामे हाती घेतली जातात अथवा रखडलेली कामे ऐन यात्रेच्या पुर्वीच पुन्हा सुरु केली जातात त्यामुळे प्रशासन सातत्याने टिकेचे धनी होत आले आहे.
पंढरपूर शहरात गेल्या दिड वर्षाच्या कालावधीत आठ प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण, कॉंक्रीटीकरणसह   विविध ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे, भाविकांच्या सुविधेसाठी विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारणे, यात्री सुुविधा केंद्र उभारणे, पाणी पुरवठ्याशी संबंधित विविध कामे करणे, पालखी तळासह पालखी मार्गावर भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा केंद्र उभारणे, पालखी तळाचा विकास करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय करणे, यात्रा कालावधीत शहरातील वीज पुरवठा खंडीत होवू नये म्हणून वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून शहरातील वीज वहन व्यवस्था व आपत्कालिन व्यवस्थेची दक्षता घेणे, शहरातील आरोग्य व्यवस्था, मोकाट जनावरे, मोकाट जनावरे पकडणे, मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, तात्पुरत्या स्वरूपातील फॅब्रीकेटेड शौचालयाची उभारणी, भाविकांना आरोग्य व्यवस्था व पार्कींग सुविधा उपलब्ध करून देणे, पालखी मार्गावरील विविध पालखी तळावर व पालखी मुक्कामाच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना तातडीने निधी उपलब्ध करून देवून पालखी मार्गावरील रस्त्यावरील आडवे येणारी झाडेझुडपे तोडणे, जंतूनाशक औषधांची फवारणी करणे, पालखी मार्गाची दुरूस्ती करणे, मुरूम टाकून रोलर फिरविणे आदी कामे आषाढी यात्रा नियोजनाच्या नावाखाली आषाढी यात्रेच्या तोंडावर अगदी एक महिन्याचा अवधी शिल्लक असताना काढली जातात. वास्तविक पाहता पावसाळ्याच्या मोसमात हवेत आर्द्रता असताना रस्त्याचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण अशा स्वरूपाची कामे करण्यास राज्य शासनाने प्रतिबंध घातलेला आहे. मात्र तरीही यात्रा नियोजनाच्या नावाखाली रस्ता दुरूस्तीची, डांबरीकरणाची व कॉंक्रीटीकरणाची कामे अगदी पडत्या पावसात केली जात असल्याचे दृश्य आषाढी यात्रे पूर्वीच्या नेमके एक महिना आधी का पहावयास मिळते?  हे एक गौडबंगालच आहे.
भाई राऊळ पुतळा ते वृंदावन नगर या रस्त्याच्या रूंदीकरणाची व कॉंक्रीटीकरणाची निविदा निघून जवळपास 18 महिन्याचा कालावधी लोटला.गत आषाढी यात्रेपुर्वी मे 2017 मध्ये तात्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी यांनी यात्रा नियोजनाची पहीली बैठक घेतल्यानंतर व यानंतर केवळ आठ दिवसात  मृग नक्षत्राची बरसात सुरू झाल्यानंतर येथील  विविध रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे   बंद पडलेले काम मोठ्या ङ्गजोमानेफ सुरू करण्यात आले होते.याबाबत पंढरपूर नगरपालिकेसह अगदी पुणे विभागीय आयुक्तापर्यंत पंढरी वार्ताच्या वतीने तक्रारी केल्यानंतर पुढे हे कॉंक्रीटीकरणाचे काम निदान पावसाळा होईपर्यंततरी थांबले होते.आषाढी यात्रा नियोजनाच्या वेळी होणार्‍या घाई आणि गडबडी बाबत अनेक प्रवाद असून  बरेचसे लिहिण्यासारखे आहे.पंढरपूर शहरात ऐन यात्रा कालावधीत वर्क ऑर्डर देवूनही रखडलेल्या व  तातडीने निविदा मागवून पावसाळ्याच्या हंगामात गडबडीने उरकण्यात येत असलेल्या प्रत्येक टेंडरचा ङ्गअभ्यासफ करणे गरजेचे झाले आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव