पंढरी वार्ता :- शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही जि.प.सदस्या शैला गोडसे यांचा इशारा; बेगमपूर येथे रास्ता रोको

उजनीतून भीमा नदीत तात्काळ पाणी सोडावे, सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत आदी मागण्यांसाठी भीमा नदीकाठ बचाव संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी (दि.२४) जि.प. सदस्या शैला गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील बेगमपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली. पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच हे आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान, पाण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही, दिसतील तेथे घेराव घालून जाब विचारू, असा इशाराही गोडसे यांनी यावेळी दिला.नदीकाठची शेती आणि शेतकरीही महत्वाचे
केवळ सोलापूर शहराचा पाणीपुरवठा डोळ्यासमोर ठेवून नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. तोपर्यंत नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसतो. यापुढील काळात नदीकाठाचे शेतकरी आणि शेतीचा प्राधान्याने विचार करून पाणी सोडण्याचे ठोस नियोजन झाले पाहिजे, असेही शैला गोडसे म्हणाल्या.
भीमा नदीत पाणी सोडण्याच्या विषयावर नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. महिनाभरापासून नदीचे पात्र कोरडे असून उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमिवर जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार सकाळपासूनच नदीकाठच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी बेगमपूर चौकात गर्दी केली होती. सकाळी १० वाजता स्वत: गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी रस्त्यावर ठिय्या दिला. दीड तास हे आंदोलन सुरूच राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाटबंधारे विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन ठोस लेखी उत्तर दिल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका गोडसे यांनी घेतली. अखेर कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी येऊन निवेदन स्वीकारले. तसेच दि. २९ जून ते २ मे दरम्यान पाणी सोडण्याची कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले.
यावेळी पं.स. सदस्य नागराज पाटील, जकराया शुगरचे चेअरमन ॲड.बी.बी. जाधव, जि.प. सदस्य नितीन नकाते, राजेश पवार, डॉ. बाळासाहेब सरवळे, रफीक पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रा. माऊली जाधव, भारत आतकरे, हरिभाऊ काकडे, जगदीश पाटील, हरिभाऊ घुले, विनोद कदम, विशाल पवार, दादा पाटील, नागनाथ माने, बजरंग शेंडेकर, बंडू कलुबर्मे, तानाजी चोरगे, केशव पाटील, आनंद जाधव, सुभाष बाबर, अशोक भोसले, सुग्रीव पाटील, कमलाकर कदम आदींसह बेगमपूर, अरबळी, मिरी, अर्धनारी, येणकी, माचणूर, बठार, तामदर्डी, सिध्दापूर, आंबेचिंचोली आदी नदीकाठच्या गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव