पंढरी वार्ता:- अस्वस्थ भीमाकाठ संतप्त शेतकरी,काळेंचा मोर्चा,आ.भालकेंचा इशारा ! अन् आमदार बबनदादा शिंदेचे मौन ! खा.महाडिकांचा‘दौरा’नसल्याने प्रतिक्रिया नाही !

गतवर्षी उजनी धरण पाणी वाटपाबाबत दोन वर्षाच्या नियोजनाची घाट घातला होता तर यावर्षी सोलापूर शहरासाठी अमृत योजनेतून शासनाने 439 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करीत समांतर जलवाहीनीस मंजुरी दिली आहे.या दोन्ही घटना भीमा नदीकाठाच्या शेतकर्‍यांच्या द्रष्टीने अतिशय महत्वपुर्ण आहेत.सद्या भीमा नदीकाठ अतिशय संतप्त व अस्वस्थ असताना जिल्हयाचे पालकमंत्रंी ना.विजयकुमार देशमुख हे हा  प्रश्‍न गंभीरतेने हाताळताना दिसत नाहीत.त्यामुळेच ते  केवळ सोलापूर शहराचेच पालकमंत्री आहेत की काय ? अशी भावना नदीकाठच्या शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.तर सोलापूर लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा लढविण्याच्या तयारीत असलेेल सुशिलकुमार शिंदे हेही या बाबत मौन बाळगून असून पंढरपूर-मोहोळ,मंगळवेढा तालुक्यातील काही ठरावीक नेत्यांना हातशी धरले आणि रसद पुरवली की निवडणूकीत स्थानिक नेते पळतात या भ्रमात राहून निवडणूक लढविण्याचे दिवस उरलेलेे नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे अशी भावना कॉग्रेसचे पारंपारीक समर्थक असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.
 सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते या गंभीर प्रश्‍नाबाबत मौन बाळगून असले तरी आता भीमा नदीकाठचा शेतकरी मात्र आपल्या न्याय्य हक्कासाठी वाटेल तो संघर्ष करण्यास सज्ज झाल आहे.भीमा-सिना जोड कालव्यासाठी मंत्रीपदाला ठोकर मारणारे आ.बबनदादा शिंदे यांनी मौन सोडून त्यांच्याच माढा मतदार संघात समाविष्ट झालेल्या पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या या जीवनमरणाच्या प्रश्‍नाबाबत आता संघर्षासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
        उजनी धरणाच्या पायाभरणीवेळी ‘‘ विठ्ठल मला माफ कर,तुझी चंद्रभागा मी अडवून शेतकर्‍यांच्या दारात पोहोचवत आहे ’’असे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण म्हणाले होते.मात्र आता नेमके उलटाच प्रकार घडताना दिसून जन्मदात्या आईचाच गळा मुलाच्या हाताने घोटण्यात येत आहे,उजनी धरणाच्या निर्मितीनंतर एकेकाळी अव्याहतपणे वाहणारी चंद्रभागा बंदीस्त झाली.सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याच्या निमित्ताने ती अधून मधून वहात रहायची आता मात्र उजनी धरणाने भीमेच्या अस्तित्वावर गदा आणली आहे.
         आ.भारत भालके यांनीही याबाबत शासनास इशारा दिला असून तेही नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या या गंभीर प्रश्‍नासाठी संघर्ष करण्याच्या तयारीत आहे.भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये भीमा कारखान्याचे चेअरमन खा.धनंजय महाडिक यांचे वर्चस्व आहे.या नदीकाठच्या भागातूनच भीमा कारखान्यास मोठया प्रमाणात ऊस गाळपास मिळतो.पण आता भीमा नदी ही फक्त पावसाळ्यात पावसाच्या पाण्याणेच थोडीफार वाहणार आहे.या गंभीर प्रश्‍नाबाबत खा.धनंजय महाडिक यांनीही याबाबत मौन बाळगले असून अलीकडच्या काळात त्यांचा भीमा कारखान्यास भेट देण्याचा ‘दौरा’नसल्याने कार्यकर्त्यांनी कोल्हापूर भेटीत या गंभीर प्रश्‍नाबाबत त्यांना अवगत करुन देणे गरजेचे झाले आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव