पंढरी वार्ता:-पंढरीतील नवीन व जुन्या बसस्थानकाच्या आवारात मिनी गाळे बांधून बेरोजगारांना द्या ! एस.टी.चालक वाहकांसाठी सुसज्ज एस.टी.भवन बांधा ! आदिम विकास परिषदेची ना.रावतेंकडे निवेदनाद्वारे मागणी
पंढरीतील नवीन व जुन्या बसस्थानकाच्या आवारात मिनी गाळे बांधून बेरोजगारांना द्या !
एस.टी.चालक वाहकांसाठी सुसज्ज एस.टी.भवन बांधा !
आदिम विकास परिषदेची ना.रावतेंकडे निवेदनाद्वारे मागणी
पंढरपूर शहरातील नविन बसस्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस व जुन्या बसस्थाकाच्या पुर्वेस मिनी गाळे काढून सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसायासाठी अल्प डिपॉझीट व भाडे घेवून उपलब्ध करुन द्यावीत.पंढरपूर बसस्थानकात मुक्कामी गाडया घेवून येणार्या वाहक व चालकासाठी येथील बसस्थानक परिसरात एस.टी.भवन बांधण्यात यावे अशी मागणी आदिम विकास परिषदेच्या वतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहीती देताना आदीम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव म्हणाले की,पंढरपूर शहर व तालुक्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. यात्राकालवधी वगळता इतरवेळी उत्पन्नाचे साधन नसल्याने तसेच मोठे उद्योग व्यवसाय नसल्याने येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने नविन बसस्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वे रुळाच्या बाजूस मिनी गाळे काढण्यात यावेत.त्यामुळे हा परिसरही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे, बेरोजगारांना उदरनिवार्हाचे साधन उपलब्ध होणार आहे व परिवहन महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.त्याच प्रमाणे जुन्या बसस्थानकाच्या आवारतही अनेक ठिकाणी अशा स्वरुपाचे मिनी गाळे काढता येणे शक्य आहे.या बाबतही विचार होणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे येथे तिर्थक्षेत्र असल्याने राज्यभरातून एस.टी.बस मुक्कामी येतात.येथे मुक्कामी रहावे लागत असलेल्या वाहक व चालकांना पुरेशा प्रमाणात व सुविधायुक्त एस.टी.भवन उभारल्यास वाहक व चालकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.या मागणीचे निवेदन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले आहे.
हे निवेदन देताना आकाश जगदाळे,धिरज परचंडराव,किरण पिसे,सतवीन आतार,नरेश जवंजाळ,नितिन पानकर,सुनिल हिरणवाळे,विलीन परचंडे,विजय सुरवसे आदी उपस्थित होते.
