पंढरी वार्ता :-भारतीय राज्य घटनेमुळे समता, न्याय, बंधूता या मूल्यांची जोपासना झाली़-भालचंद्र मुणगेकर पंढरपुरात पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्घाटन

भारतीय राज्य घटनेमुळे समता, न्याय, बंधूता या मूल्यांची जोपासना झाली़-भालचंद्र मुणगेकर
पंढरपुरात पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्घाटन

भारतीय राज्यघटना ही एक आदर्श असून स्वातंत्र्यानंतर देशाची जी काही प्रगती झाली ती केवळ राज्यघटनेमुळेच़ मात्र भाजपा सरकारमधील नेते भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात़ त्यामुळे या आदर्श राज्य घटनेचे संरक्षण करणे एक आव्हान आहे, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे माजी सदस्य खा़ डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी केले़ 

लोकराजा राजर्षी छ़ शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते़ व्यासपीठावर आरपीआय नेते सुनील सर्वगोड, बा़ ना़ धांडोरे, प्रा़ वामन जाधव, अमरजीत पाटील, परिवर्तन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड़ किर्तीपाल सर्वगोड, कवी प्रा़ प्रशांत मोरे, प्रा़ डॉ़ विजय मोरे, ह़ भ़ प़ रामदास ऊर्फ शिवराज महाराज जाधव, डॉ़ टी़ एस़ मोरे, समितीचे उपाध्यक्ष वैभव माने, सचिव संतोष गायकवाड, कोषाध्यक्ष सचिन कांबळे आदी उपस्थित होते़ प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून दीपप्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन झाले़ 

भारतीय राज्य घटनेमुळे समता, न्याय, बंधूता या मूल्यांची जोपासना झाली़ परिणामी देशाची प्रगती झाली़ पण या प्रगतीचे फायदे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, त्या प्रमाणात श्रीमंतांच्या आणि राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे झाले नाही़  आर्थिक फायदे गरीबापर्यंत पोहोचलेच नाहीत़ त्यामुळे गरीब हा गरीबच राहिला़ २०१४ च्या निवडणुकीदरम्यान भाजपा सरकारने जनतेला जी आश्वासने दिली त्याची पूर्तता केली नाहीत़ उलट नोटाबंदीसारख्या कायद्यामुळे देशाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे़ कोणतेही सरकार असो देशाची  राज्यघटनेचे संरक्षण केले पाहिजे़ कारण तोच सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे़ मात्र भाजपामधील नेते राज्य घटना बदलण्यासाठी आटापिटा करीत आहेत़ असे झाले तर गोरगरिबांना न्याय मिळणार  नाही़ त्यांचा विकास होणार नाही़ त्यामुळे दलित, पीडित, आदिवासी लोकांनी प्रसंगी रस्त्यावर उतरून प्राणपणाने या राज्यघटनेचे संरक्षण केले पाहिजे, असे आवाहन डॉ़ मुणगेकर यांनी केले़ 

ज्या काळात दलितांवर अन्याय, अत्याचार होत होता तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय देण्याचे काम केले़ उपेक्षितांना संधी दिल्याशिवाय देशात शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक क्रांती होऊ शकत  नाही़ बौद्ध ही एक विचारपद्धती आहे़ तो धर्म नाही तर मानसाने, मानसाच्या हितासाठी निर्माण केलेले एक तत्वज्ञान आहे़ दलित हा वाद निरर्थरक आहे़ मात्र ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतात, जो सर्वांपासून वंचित राहातो, तो दलित होय़ कला अनेक आहेत त्यापैकीच एक साहित्य़ अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी कला निर्माण होते़ कला ही परिवर्तन करणारी असावी़ मानवी प्रगल्भता ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या वैचारिकतेतून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले़ याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, अमरजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले़

उद्घाटनापूर्वी शाहीर राजेंद्र कांबळे यांनी शाहिरीतून महापुरुषांना वंदना देऊन उपस्थितांमध्ये स्फुलिंग चेतविले़ स्वागत अ‍ॅड़ किर्तीपाल सर्वगोड यांनी केले़ प्रास्ताविक संतोष गायकवाड यांनी केले़ 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव