पंढरी वार्ता :- मुख्यमंत्र्यांनी महापुजेसाठी येवू नये !
मुख्यमंत्र्यांनी महापुजेसाठी येवू नये !
काही दुर्घटना घडल्यास जबाबदारी सरकारची- आ.भारत भालके
मराठा,धनगर,कोळी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक आंदोलनाच्या तयारीत
मराठा,धनगर,कोळी महादेव व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे या समाजांनी लोकशाही मार्गाने शांततेने केलेल्या आंदोलनाकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आता कार्यकर्ते आक्रमक आंदोलनाच्या तयारीत असून शांततापुर्ण मार्गाने मोर्चे काढून,आंदोलने करुन देखील सरकार दखल घेत नसल्यामुळे आता या प्रश्नाने उग्र रुप धारण केले आहे. आषाढी महापुजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा देण्यात आला असून त्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते पंढरपूर परिसरात मोठया संख्येने दाखल होत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशी महापुजेसाठी पंढरपूरात येवू नये जर ते येथे आल्यास आषाढी यात्रा काळात 12 ते 14 लाख भाविक पंढरीत आलेले असताना भीतीचे वातावरण निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडू शकते असा इशारा आ.भारत भालके यांनी दिला आहे .
यावेळी बोलताना आमदार भालके म्हणाले की,गेल्या अनेक वर्षापासून मराठा,धनगर व कोळी महादेव व अल्पसंख्याक मुस्लिम समाज आपल्या हक्काच्या आरक्षणाची लढाई शांततापुर्ण मार्गाने लढत आहे.वारंवार आंदोलने करुनही शासन दखल घेत नाही.मोर्चे काढूनही दाद दिली जात नाही.विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर केवळ टोलवाटोलवी केली जाते,खोटे आश्वासने देवून वेळ मारुन नेली जाते हे या समाजाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेले आहे.त्यामुळे आता शांततापुर्ण आंदोलनाचा वेळ निघून गेली आहे अशीच भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.त्यामुळे एक तर या समाजांच्या मागण्याबाबत तात्काळ कॅबीनेटची बैठक घेवून निर्णय जाहीर करावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी महापुजेसाठी येवू नये असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,यापुर्वीही आषाढी,कार्तीक एकादशी महापुजेसाठी मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना व अजित पवार, स्व.आर.आर.पाटील हे उपमुख्यमंत्री असताना अशाच प्रकार जनक्षोभाचा आदर करीत महापुजेसाठी आले नव्हते.त्यामुळे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनीही यंदा महापुजेसाठी येवू नये अन् जर यायचे असेल तर निर्णय जाहीर करुन या अन्यथा या संतप्त कार्यकर्त्यांना कुणीही रोखू शकणार नाही अशी परिस्थीती निर्माण झाल्याचे आ.भारत भालके यांनी सांगीतले.



