पंढरी वार्ता :- जो बोले सो निहाल !
जो बोले सो निहाल !
मराठा,धनगर व कोळी महादेव समाजाच्या आरक्षणाबाबत मौन बाळगलेले नेते धर्मसंकटात ?
भुमिका स्पष्ट करण्यासाठी येत आहे कार्यकर्त्यांचा दबाव
मराठा,धनगर व महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाच्या लढाईने आता उग्र रुप धारण केले असून माझ्या जिवीची आवडी । पंढरीसी नेईन गुढी ॥ हा संत तुकोबारायांचा अभंग प्रमाण मानत भडक भगव्या ध्वजाला थोडासा नरमाईचा रंग देत त्याची पताका करुन खांद्यावर घेत पंढरीची वारी करणारा मराठा समाज आता निर्वाणीच्या भुमिकेत आला असून लाखोंचे मुक मोर्चे काढून देखील हे सरकार बधत नाही,फसव्या घोषणा करुन मराठा समाजाची दिशाभूल करते हे लक्षात आल्यामुळे या समाजातील कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. ‘करा अथवा मरा’ हे स्वातंत्र्य पुर्व काळातील भारत छोडे आंदोलनाचे ब्रीद, देणार की जाणार ? या शब्दामध्ये परावर्तीत करुन यंदा संतपरंपरेची पताका बाजूल ठेवून भगवा ध्वज हाती घेवून सनदशिर मार्गाने मिळत नसेल तर आता ठोक मोर्चाद्वारे मिळवू हीच कणखर भुमिका घेवून मैदानात उतरले आहेत.या महत्वाच्या व मराठा समाजाच्या अस्मितेच्या लढयात सारे समान हेच सुत्र अवलंबण्यात येत असल्याने या लढाईत सरदार म्हणून शिरकाव करण्याची संधी कुठल्याही नेत्याला मिळाली नाही.जे मराठा समाजाच्या या लढयात सहभागी होतील ते आपले आणि जे दूर राहतील त्यांना कायमच दूर ठेवू अशी मानसिकता आता या समाजातील युवकांची झाली आहे.अशातच पंढरपूरात एकादशी महापुजेसाठी मुख्यमंत्र्याना येवू देणार नाही अशी भूमिका काही दिवसापुर्वी आंदोलनकर्त्यांनी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्याना ‘मै हु ना ! ’ असा दिलासा देणारे नेते अडचणीत आले असून जे या आंदोलनाबाबत उघडपणे पाठींबा व्यक्त करत आहेत,बोलत आहेत ते आमच्यासाठी निहाल आहेत अशी भावना आता आंदोलनकर्ते व्यक्त करीत आहेत.व संपुर्ण सोलापूर जिल्हा या आरक्षणाच्या वणव्यामुळे पेटल्यानंतरही शांत राहणारे नेते भविष्यात अडचणीत येणार हे निश्चित आहे.
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली पालं बदलली होती तर अनेक नेते थेट कुंपणावर जावून बसले होते. शिवसेनेसारख्या मित्रपक्षाने सुरुवातीपासून विरोधाची भुमिका घेतल्याने या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शाश्वती नसल्याने आपण राजकीय कुंपणावर बसुनच आपल्या संस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या ‘शेळ्या’ हाकू अशी धारणा काही नेत्यांनी करुन घेतली होती.मात्र त्याच वेळी सोलापूर जिल्ह्यात सारे आलबेल आहे,आम्ही आहोत ना असा दिलासा मुख्यमंत्र्याना देण्यात येत होता.जो पर्यंत मराठा समाजाचे मुक मोर्चे निघत होते तो पर्यंत अशा कुंपणावरील नेत्यांना काहीच अडचण नव्हती.एकीकडे मुक मोर्चासाठी आवश्यक असेल ते आम्ही पुरवू असे आश्वासन आपल्या समर्थकांना द्यावयाचे अन् दुसरीकडे मुख्यंत्र्यांना दिलासा द्यावयाचा असे तंत्र वापरले जात होते.मात्र आता मराठा समाजाचा मुक मोर्चा थेट ‘ठोक’ मोर्चात परावर्तीत झाला असून कार्यकर्त्यांचाही ‘संयम’ आता संपला आहे.देणार की जाणार ? याच निर्धाराने मुख्यमंत्र्याना पंढरपूरात येण्यापासून रोखण्याचा गनिमी कावा आता खेळला जाणार आहे.आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचाच फक्त या अंतिम लढयात सहभाग दिसून येत असून मराठा,धनगर,कोळी समाज ाच्या या जिवनमरणाच्या लढाईत जे नेते मौन बाळगतील त्यांना भविष्यात याचा मोठा फटका बसणार आहे हे निश्चित.मात्र या आरक्षणाच्या लढाईत न्या.सच्चर आयोगाने केलेल्या शिफारशी लक्षात घेवून मुस्लिम समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत यापुर्वीच्या शासनाने काही महत्वपुर्ण निर्णय घेतले होते.या न्या.सच्चर कमेटीचा अहवाल अंशत: लागू करत मुस्लिम समाजास 5 टक्के आरक्षण देण्याचा या पुर्वीच्या सरकारचा निर्णय 2014 मध्ये सत्तेत आलेल्या या शासनाने फिरवला होता.मुस्लिम समाज थेट आंदोलने करुन आपला ह्कक मागण्यास कचरत असल्याचा हे सरकार गैरफायदा उचलत असल्याचे दिसून येत आहे.
- राजकुमार शहापूरकर


