पंढरी वार्ता :- काही कर्मचार्‍यांच्या ‘अर्थपुर्ण’ व्हि.आय.पी.दर्शनास विरोध केल्यानेच माझ्याविरोधात आंदोलन !

 काही कर्मचार्‍यांच्या ‘अर्थपुर्ण’  व्हि.आय.पी.दर्शनास विरोध केल्यानेच माझ्याविरोधात आंदोलन !

सी.सी.टि.व्ही फुटेज तपासून पाहील्यास सत्य समोर येईल - सचिन अधटराव

 कलम 144 चा भंग करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा-काका बुराडे 


मंदीर समितीमधील काही पुढारीछाप कर्मचारी गेल्या काही महिन्यात अर्थपुर्ण व्हि.आय.पी.दर्शनात व्यस्त होते.व्हि.आय.पी.दर्शन पुर्णत: बंद करण्यात यावे अशा सुचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या असतानाच व भाविकांच्या गर्दीमुळे दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील शेडपर्यंत पहोचलेली असतानाच  हे कर्मचारी अधिकार्‍यांची व  सदस्यांची नजर चुकवून दर्शन रांगेत घुसखोरी करण्यास मदत करत होते.यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात होत्या.या बाबत आपण मंदीर प्रशासनाकडे  तक्रार केल्यानेच आपणाविरोधात काल आंदोलन करण्यात आले होते.मंदीर समिती प्रशासनाने तातडीने या गंभीर प्रकाराची दखल घेवून व्हि.आय.पी.दर्शन बंद करावे अशी मागणी मंदीर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी आज मंदीर समिती व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
   गुरवार दिनांक 19 रोजी मंदीर समितीच्या कर्मचार्‍यांनी आकस्मातपणे आंदोलन करीत समितीचे सदस्य सचिन अधटराव हे काही कर्मचार्‍यास शिविगाळ करतात अशी तक्रार केली होती.या आंदोलनानंतर समिती सदस्य सचिन अधटराव यांनी दिलगीरी व्यक्त केल्यामुळे या वादावर पडदा पडला होता.मात्र शुक्रवार दिनांक 20 जुलै रोजी समिती सदस्य सचिन अधटराव यांनी मंदीर समिती प्रशासनाकडे एक लेखी निवेदन दिले असून  व्हि.आय.पी.दर्शन बंद करण्याची मागणी करण्याबरोबरच समितीच्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी केलेल्या आंदोलना पाठीमागील कारणमिमांसा स्पष्ट केली आहे.या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना सचिन अधटराव म्हणाले की,समितीच्या अशा या वादग्रस्त कर्मचार्‍यांची नियुक्ती कुठे आहे,कर्तव्याची वेळ काय आहे आणि ते वावरतात कुठे याबाबतचे गेल्या काही महिन्यातील सी.सी.टी.व्ही.फुटेज तपासून पाहील्यास सत्य समोर येईल .समितीच्या 80 टक्के कर्मचार्‍यांना कालचे आंदोलन कशासाठी होते हेच माहीत नव्हते.आपल्या पगारवाढीसाठी हे आंदोलन आहे अशी थाप मारुन काही कर्मचार्‍यांनी या कर्मचार्‍यांना आंदोलनात सहभागी होण्यास भाग पाडले असा आरोपही सचिन अधटराव यांनी केला आहे.

कलम 144 चा भंग करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा-काका बुराडे 


आषाढी यात्रा कालावधीत अनुचीत घटना टाळण्याच्या उद्देशाने अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी  कलम 144 अंमल लागू केलेला असताना विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या कर्मचार्‍यांनी गुरुवार दिनांक 19 रोजी कुठलेही जाहीर प्रसिध्दीकरण न करता व पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता कलम 144 चा भंग करीत काम बंद आंदोलन केले आहे. आकस्मिकरित्या करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात भाविकांना वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे.त्यामुळे स्थानिक नागरिक व भाविक यांच्यामध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.अशा ंकर्मचार्‍यांवर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक काका बुराडे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
          या बाबत अधिक माहीती देताना काका बुराडे म्हणाले की,विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील काही कर्मचार्‍यांना राजकारणाची लागण झालेली आहे.काही कर्मचारी विविध पक्षाच्या विविध नेत्यांची बांधीलकी जोपासत  कर्तव्याच्या वेळेव्यतीरिक्त मंदीरात अथवा मंदीर परिसरात वावरताना दिसून येतात.या पैकी अनेक कर्मचार्‍यांची नेमणुक परिवार देवतांच्या सेवेसाठी झालेली असतानाही नियुक्तीच्या ठिकाणी  थांबण्याऐवजी हे कर्मचारी श्री विठ्ठल मंदीरात अथवा दर्शनबारी परिसरात वावरताना आढळून येतात.या बाबत मंदीर समितीने सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहील्यास सत्य समोर येईलच.मंदीर समिती प्रशासनाने समितीच्या कर्मचार्‍यांच्या नेमणुकीचे ठिकाण नमूद केलेला बॅच अशा कर्मचार्‍यांच्या गणवेशावर लावणे बंधनकारक करावे तसेच कर्तव्याचे ठिकाण आणि वेळ सोडून इतर वेळी मंदीरात अथवा दर्शनरांगेच्या ठिकाणी वावरणार्‍या कर्मचार्‍यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आम्ही मंदीर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यंंमंत्री,विधी व न्याय मंत्री,पालकमंत्री,राज्याचे गृह सचिव व जिल्हाधिकारी यांनाही फॅक्सद्वारे पाठविलेल्या आहेत अशी माहीती ज्येष्ठ शिवसैनिक काका बुराडे यांनी दिली आहे.
                         


Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव