पंढरी वार्ता:- लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करा
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करा
खा.धनंजय महाडिक यांची लोकसभेत लक्षवेधीद्वारे मागणी
आपल्या कृतीतून आणि विचारातून समतेचा संदेश देणारे लोकराजा शाहू महाराज यांचे जिवनकार्य अद्वितीय असून या देशातील समतेच्या चळवळीस राजसत्तेचा पाठींबा मिळण्याचे सर्वप्रथम उदाहरण आहे.त्यांनी आपल्या हयातीत केलेल्या कार्याची दखल घेवून त्याना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी मागणी खा.धनंजय महाडिक यांनी आज लोकसभेत लक्षवेधी सुचनेद्वारे केली आहे.
महाराष्ट्राने देशाला अनेक समाज सुधारक दिल समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते. समाजातल्या तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात पहिल्यांदा सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणी वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले.ते कर्ते सुधारक होते आपल्या राज्यातील फासेपारधी ,मातंग , गारूडी यांना त्यांनी आपल्या दरबारात नोकर्या दिल्या एवढे करून ते थांबले नाही तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. धनगर मराठा विवाह घडवून आपली उक्ती आणी कृती एकच आहे हे समाजाला दाखवून दिले.शेतकर्यांसाठी त्यांनी त्या काळात राधानगरी धरण बांधून शेतीविकासाला चालना दिली. शेतमाल खरेदी विक्रीसाठी त्यांनी मार्केट यार्ड तयार करून कोल्हापूरात एक बाजारपेठ निर्माण केली. त्यांनी विधवेच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहान दिले .कुलकर्ण्यांची वतने रद्द केली. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणारा हा पहिला राजा भारतातील राजा होता.अशा या थोर राजाचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देवून गौरव केला जावा अशी मागणी खा.धनंजय महाडिक यांनी संसदेत केली आहे.


