पंढरी वार्ता :- महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी सुजाता लोखंडे यांची निवड
महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी सुजाता लोखंडे यांची निवड
महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघांच्या तालुकाध्यक्षपदी सुजाता सुरेश लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या प्रदेश संस्थापक अध्यक्षा यशश्री प्रमोद पाटील यांनी त्यांना या निवडीचे पत्र नुकतेच प्रदान केले आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ संपुर्ण राज्यभरात कार्यरत असून या संघाच्या माध्यमातून पोलीस कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटीतपणे प्रयत्न केले जातात.तर पोलीस कुुटंबीयांच्या विविध समस्याबाबत जनजागृती केली जाते.
या बाबत अधिक माहीती देताना नुतन तालुकाध्यक्षा सुजाता लोखंडे म्हणाल्या की,मनुष्यबळ कमी असल्यामुळे राज्यातील पोलिसांना रोज 12 ते 14 तास काम करावे लागते. पुरेशी साधने नसतानाही जोखीम पत्करावी लागते. यात कुठे चूक झाली तर वरिष्ठांकडून तंबी मिळते.त्यांची बोलणी खावी लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. बदली, निलंबन, बडतर्फीची टांगती तलवार असतेच. अशा या वातावरणात काम करीत असताना पोलिसांवर प्रचंड मानसिक ताण येतो. या तणावातून पोलीसांच्या संपुर्ण कुटुंबास सामना करावा लागतो.सतत बदली,निवासाठी उपलब्ध असलेल्या कॉटेजच्या ठिकाणी मुलभूत सोयी सुविधांचा अभाव याला सामोरे जाताना खरा त्रास पोलीस पत्नींना सहन करावा लागतो.त्यामुळे आपल्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र येवू या भावनेने या संघाची वाटचाल सुरु आहे.या संघाच्या ध्येयधोरणाशी बांधीलकी मानीत आपण संघाच्या विस्तारासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सुजाता लोखंडे यांनी या निवडीबाबत प्रतिक्रीया व्यक्त करताना दिली.
