पंढरी वार्ता :- पंढरपूर शहरातील चंद्रभागा काठच्या रेड लाईन आणि ब्ल्यु लाईन पुररेषेचा फेरसर्व्हे होणार

 पंढरपूर शहरातील चंद्रभागा काठच्या रेड लाईन आणि ब्ल्यु लाईन पुररेषेचा फेरसर्व्हे होणार 
बांधकाम परवाने देताना करावी लागणार काटेकोर अंमलबजावणी
गेल्या 50 वर्षातील महापूर लक्षात घेवून होणार सर्व्हे ! 



भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने भीमा नदीकाठच्या पुररेषेचा फेरसर्व्हे होणार असून गेल्या 50 वर्षात भीमा नदीस आलेले महापूर व या महापूर काळात नागरी वस्तीत घुसलेले महापुराचे पाणी याचा गेल्या 50 वर्षाचा अभ्यास करुन रेडलाईन व ब्ल्यु लाईन पुररेषा नव्याने आखण्यात येणार आहे.यासाठी भीमा पाटबंधधारे विभागाच्या वतीने सर्व्हेसाठी निविदा आमंत्रीत केल्या आहेत.या साठी सुमारे 70 लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे.पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठचा मोठा लोकवस्तीचा परिसर या  पुरेषेच्या आत येत असून या मध्ये अनेक अधिकृत व अनधिकृत झोपट्टयांचाही समावेश आहे.महापूराच्या काळात मोठया प्रमाणात पुनर्वसन करावे लागत असल्याने पुररेषेच्या आत बांधकाम परवाने देताना विशिष्ट अटींची पुर्तता करणे नगरविकास खात्याने बंधनकारक केले आहे.या पुररेषेच्या नव्याने आखणीनंतर या पुररेषेच्या आतील रहिवाशांना शासनाच्या बांधकाम परवान्याबाबतच्या नियमाचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
           चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेल्या पंढरीस आता पर्यंत अनेकवेळा पुराचा फटका बसला असून गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासाचे अवलोकन केले असता 1956 व 2007 मध्ये चंद्रभागा नदीस आलेला पुर हा  सर्वात मोठा महापूर समजला जातो.पंढरपूर शहर हे मुख्यत: चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले असून गेल्या वीस वर्षात या शहराचा विस्तार उपनगरांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात झाला आहे.मात्र या शहराचा मुख्य गावठाण भाग म्हणून ओळखल्या गेेलेल्या चंद्रभागा नदीच्या काठावरच अनेक मोठ मोठे मठ व दाट लोकवस्ती असल्याचे आढळून येते. जेव्हा भीमा नदीस पूर येतो तेव्हा नदीकाठच्या रहिवाशांनाच मोठया प्रमाणात विस्थापीत व्हावे लागते.हा निरंतरचा धोका लक्षात घेवून शासनाच्या जलसंपदा विभागाने 3 मे रोजी याबाबत नव्याने आदेश निर्गमीत केले असून नदीकाठच्या परिसरात बांधकाम परवाने देताना नदीकाठच्या परिसरातील बांधकामांच्या जोत्याची उंची ही लाल पूररेषेच्या आत असली पाहीजे व लाल पुररेषेपेक्षा अधिक धोकादायक असलेल्या निळ्या रंगाच्या पुररेषेेत स्थायी स्वरुपाच्या बांधकामांना परवानगी देण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशातच आता भीमा पाटबंधारे विभाग नदीकाठच्या लाल आणि निळ्या पुररेषेची फेरआखणी करणार आहे.
  महाराष्ट्रात साधारणत: नदीच्या तीरावर मोठी शहरे वसलेली आढळत.पावसाळ्यात पुराचा धोका टाळण्यासाठी ही नदीपात्रापासून विशिष्ट अंतर ठेवत व पुरांची वारंवारता लक्षात घेत बांधकामे केली जात आली आहेत.निळ्या पुररेषेच्या आत बांधकामे करताना सार्वजनिक हिताच्या कामांना म्हणजेच रस्ते,मलनिस्सारण व्यवस्था,पाणी पुरवठा पाईपलाईन आदी कामांना परवानगी असेल तर लाल पुररेषेत बांधकामे करताना जोता पातळी ही लाल पुररेषेच्या समांतर असली पाहीजे.जेणे करुन गंभीर पुर परिस्थीतीत नागरिकांचे स्थलांतर करणे शक्य होऊन जिवीत हानी होणार नाही.
     पंढरपूर शहर हे चंद्रभागेच्या काठावर वसलेले असतानाच या शहरातील अनेक अधिकृत व अनधिकृत झोपडपट्टया व अनेक मठ  या पुरबाधीत निळ्या व लाल रेषेच्या आत येताहे. त.त्या मुळे या क्षेत्रात बांधकाम परवाने देताना आता जोत्याची उंची महत्वाची ठरणार आहे.शहरातील अनेक झोपटपट्टी धारकांनी प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअर्तंगत पक्की घरे मंजूर झाली असून या घरांचे बांधकाम करताना आता शासनाच्या नव्या नियमाचा आधार घेत बांधकाम परवाने देणे बंधनकारक झाले आहे.त्यामुळे या घरांच्या बांधकामाचे बजेट हे जवळपास दुपटीने वाढणार आहे . 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव