नगर पालीका क्षेत्रातील करपात्र मालमत्तांचे सर्वेक्षण पुर्ण
नगर पालीका क्षेत्रातील करपात्र मालमत्तांचे सर्वेक्षण पुर्ण
17 सप्टेंबर पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत
‘त्या’166 जागेतील भाडेकरुंचा मुद्दा ऐरणीवर
मठ,धर्मशाळा,लॉज आणि शापिंग सेंटरच्या तळमजल्याच्या पार्कींग स्पेसमधील भाडेकरु करआकारणीच्या कक्षेत येणार ?
पंढरपूर नगर पालीका हद्दीतील सर्व रहिवाशी इमारती,घरे,मठ,धर्मशाळा,लॉज,शापिंग कॉम्प्लेक्स तसेच खुल्या जागा यांची पंढरपूर नगर पालीकेच्या करविभागाच्या वतीने नगर पालीकेच्या कर विभागातील कर्मचार्यांकडून दर चार वर्षातून सर्व्हेक्षण करुन या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचे नव्याने करनिर्धारण करण्यात येते.गेल्या चार वर्षाच्या कालावधीत पंढरपूर नगर पालीकेच्या वतीने नव्याने देण्यात आलेले बांधकाम परवाने,वापर परवाने,दुरुस्ती परवाने,वाढीव बांधकामांसाठीचे परवाने लक्षात घेवून तसेच सद्य स्थितीतील मालमत्ता धारकांचे बांधकाम,भाडेकरु,व्यवसायीक वापरातील जागा याचा संपुर्ण सर्व्हे पंढरपूर नगर पालीकेच्या कर्मचार्यांनी गेल्या सुमारे वर्षभरात पुर्ण केला असून त्या नुसार आता शहरातील मालमत्तांचे नव्याने करनिर्धारण सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे.त्यानुसार शहरातील मालमत्तांवर पुढील चार वर्षासाठी करआकारणी केली जाणार आहे.
पंढरपूर शहरातील सर्व मालमत्तांमधील मुळ मालक,वहिवाटदार व भाडेकरु,भोगवटाधार यांची नोंद या रिविजन मध्ये करण्यात आली आहे.या मध्ये पंढरपूर शहरामध्ये नगर पालीकेच्या मालकीच्या असलेल्या व अतिशय मोक्यावरील मालमत्तांचाही समावेश असून या ठिकाणी पोट भाडेकरु ठेवून भाडे वसूल केले जात असेल तर त्याचीही नोंद या करनिर्धारण रिवीजन नुसार करणे बंधनकारक आहे.तर पंढरपूर शहरातील नदीकाठच्या व मंदीर परिसरासह शहराच्या मुख्य रस्त्यावरील अनेक मठ,धर्मशाळा,लॉज,खाजगी शापिंग सेंटर यांच्यातील भाडेकरुंची नोंद करुन भाडेकरारातून मालमत्ता धारकास मिळणार्या उत्पन्नाच्या 33 टक्के रक्कम पंढरपूर नगर पालीकेस भाडेकरु टॅक्सपोटी जमा करावी लागते.मात्र अनेक मालमत्ता धारकांनी विशेषत: व्यवसायीक गाळे भाडयाने देणार्या अनेक मालमत्ता धारकांनी आपल्या मिळकतीमधील भाडेकरुंशी करार करताना तो योग्य ते मुद्रांक शुल्क भरुन दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करुन करार करणे बंधनकारक असताना केवळ नोटरीद्वारे करार केलेले दिसून येतात.अशा प्रकारे मुद्रांक शुल्क न भरता नोटरीद्वारे करण्यात आलेले करार हे बेकायदेशीर असल्याचे जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.त्या मुळे पंढरपूर नगर पालीकेच्या वतीने करण्यात आलेल्या करनिर्धारण सर्व्हेत नोटरीद्वारे करण्यात आलेले करार विचारात घेतले असतील तर ते बेकायदेशीर ठरणार आहेत.
यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शहरातील टिळक स्मारक समोरील नगर पालीकेच्या मुळ मालकीच्या खुल्या जागांमध्ये गाळे काढून अथवा खुली जागा भाडयाने देवून वर्षाकाठी लाखो रुपये भाडयापोटी उकळनार्या मालमत्ता धारकांवर कारवाई होणार का ? याकडेही पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.पंढरपूर नगर पालीकेने केलेल्या आवाहनानुसार शहरातील नागरिकांना या बाबत 17 सप्टेंबर 2018 अखेर पर्यंत आपल्या हरकती दाखल करता येणार असून एका हरकतीच्या तक्रार अर्जात एकाच मालमत्तेच्या करसंकलनाबाबत तक्रार करता येणार आहे.
