राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे यांच्या मोबाईल संभाषणाच्या ‘त्या’ कथित क्लिपमुळे मोहीते-पाटील समर्थकात अस्वस्थता
पक्षात वरिष्ठ पातळीवरुनच‘कडवट’ गटबाजी जोपासली जात असल्याचे उघड
1990 च्या दशकात ‘मोहीते-पाटील बोले आणि जिल्हा हाले’ अशी राजकीय परिस्थीती होती.स्व.शंकरराव मोहीते-पाटील यांनी 1960-70 च्या दशकात अगदी बैलगाडीतून प्रवास करुन सोलापूर जिल्ह्यातील वाडया वस्त्यावरील नेत्यांना आपल्या प्रभावाखाली आणून मोहीते-पाटील गटाचे पाळेमुळे बळकट केले होती.करमाळा ते अक्कलकोट आणि मंगळवेढा ते बार्शी असा संपुर्ण सोलापूर जिल्ह्याच्या चारही दिशावंर आपला राजकीय प्रभाव निर्माण करण्यात मोहीते-पाटील यशस्वी ठरले होते.त्या काळी स्व.शंकरराव मोहीते-पाटील आणि स्व.नामदेवराव जगताप हे दोनच प्रमुख राजकीय गट सोलापूर जिल्हयाच्या राजकारणात सर्वात प्रभावशाली म्हणुन ओळखले जात होते.स्व.शंकरराव मोहीते-पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे जेष्ठ सुपुत्र विजयसिंह मोहीते-पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणाची सुत्रे आपल्या हाती घेतली.नामदेवराव जगताप गट पुढे प्रभावहीन होत गेला त्यामुळे या गटाचे अस्तित्व केवळ करमाळा तालुक्यापुरतेच मर्यादीत झाले आणि जिल्ह्यावर मोहीते-पाटील गटाचा एकछत्री अंमल सुरु झाला.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,सोसायटी मतदार संघातून बहुसंख्य संचालक निवडले जात असल्याने जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या यावर मोहीते-पाटील समर्थकांची राजवट जवळपास तीन दशके होती.मोहीते-पाटलांना वगळून सोलापूर जिल्ह्याचे राजकारण करणे अशक्यप्राय असल्यानेच खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांनी जवळपास 20 वर्षे राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबीनेट मत्री म्हणून काम पाहीले.1998 मध्ये शरद पवार यांनी कॉग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यावर राजकीय अंमल असलेले मोहीते-पाटील काय भुमिका घेतात याची चिंता दस्तूरखुद्द शरद पवार यांना देखील काही काळ लागली होती.विजयदादांची समजूत काढण्यासाठी त्याकाळी शरद पवार समर्थक अनेक दिग्गज नेत्यांनी अकलूजच्या डझनभर वार्या केल्या होत्या.कारण सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस मजबूत करायची असेल तर मोहीते-पाटलांना वगळून चालणार नाही याची जाणीव दस्तूरखुद्द शरद पवार यांनाही होती.असे असताना आता घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात या म्हणीप्रमाणे मोहीते-पाटील यांच्या विरोधात अनेक राजकीय कुरघोडया करण्याचा प्रकार होताना दिसून येत असून एकेकाळचे मोहीते-पाटील यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील यांची अक्कलकोट तालुक्यातील एका कार्यकर्त्यासोबतच्या संभाषणाची कथीत क्लिप सोशल मिडीयावर फिरत असून ही क्लिप खरी आहे का कुठे आहे हे अजून स्पष्ट झाले नसले तरी या क्लिप मध्ये दिपक साळुंखे यांनी आपल्याच पक्षातील मोहीते-पाटील समर्थकांबद्दल वापरलेली भाषा अतिशय गलिच्छ असल्याने जिल्हा राष्ट्रवादीतील मोहीते-पाटील समर्थकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोहीते-पाटील गटाचा राजकीय प्रभाव ओसरत जाण्यामागे 2007 मध्ये झालेली मतदार संघ पुनर्रचना हे एक कारण आहे. माळशिरस विधानसभा मतदार संघ राखीव झाल्याने खा.विजयदादांनी माढा विधानसभा मतदार संघासाठी आग्रह धरला आणि इथूनच मोहीते-पाटलांच्या जिल्ह्यावरील राजकीय प्रभावास उतरती कळा लागली.मात्र या पडझडीची सुरुवार खर्या अर्थान 2004 मध्ये झालेल्या आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीपासूनच झाली होती.आदीनाथ कारखान्याच्या निवडणुकीत मोहीते-पाटील समर्थकांनी आपले स्वतंत्र पॅनल उभा केले.आणि येथूनच अजित पवार आणि मोहीते-पाटील यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षास सुरुवात झाली.जिल्ह्यातील मोहीते-पाटील विरोधी गटास बळ देण्याचे काम अजित पवार यांनी केले असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष अजित पवार यांनी कधीही या बाबत चकारशब्द काढला नाही.माढा विधानसभा मतदार संघासाठी दावा केल्यानंतर आ.बबनदादा समर्थकांनी मोठया धाडसाने आणि नेटाने मोहीते-पाटील गटास विरोध सुरु केला.पुढे या विरोधाचा विस्तार होत गेला आणि त्याचे लोण संपुर्ण जिल्ह्यात पसरले.हा संघर्ष पुढे इतका टोकाला गेला ज्या जिल्हापरिषदेवर अकलुजकरांचे तीन दशके निर्विरोध वर्चस्व होते त्याच जिल्हा परिषदेत एका कमेटीच्या सभापती पदाच्या निवडणुकीतही त्यांना पराभूत करण्यात आले.खा.विजयसिंह मोहीते-पाटील हे जरी माढा लोकसभा मतदार संघाचे सद्या प्रतिनिधीत्व करीत असले तरी पक्षाने महत्वाच्या निर्णय प्रक्रियेपासून त्यांना दूर ठेवले जाते अशी भावना जिल्ह्यातील मोहीते-पाटील समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे घनिष्ट ’स्नेही‘माजी महसुल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी पंढरपूरात येवून माढा मतदार संघातून आपण इच्छुक असल्याचे माध्यमांना सांगणे,यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.दिपक साळुुंखे यांनीही आपण माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागणार असल्याची घोषणा करणे या पाठीमागचे ‘लॉजिकची’मोहीते-पाटील समर्थकांमध्ये झालेल्या चर्चेचा पहीला अद्याय संपत नाही तो पर्यंत आता थेट राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.दिपक साळुंखे यांनी केलेल्या कथीत संभाषणात मोहीते-पाटील समर्थकांबद्दल वापरलेली भाषा जिल्ह्याचे राजकारण कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे हेच दर्शविते.जिल्ह्यात मोहीते-पाटील गटास शह देण्यासाठी अगदी सोलापूर विद्यापिठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत देखील सक्रिय सहभाग घेतलेल्या जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना शरद पवार यांनी जुन महिन्यातील माढा दौर्यात ’जिल्ह्याचे नेते’ म्हणून संबोधले होते.त्यामुळे आता जिल्ह्याच्या नेतृत्वाची आरर या पारची लढाई लढण्यासाठी मोहीते-पाटील परिवारातील पुढच्या पिढीने एकत्र येवून कामाला लागावे अन्यथा उरल्या सुरल्या समर्थकांना भविष्यात राजकीय प्रवाहातून बाजुला पडावे लागेल व मोहीते-पाटील गट केवळ माळशिरस तालुकयापुरताच मर्यादीत होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
(पंढरी वार्ताचे विशेष आर्टीकल- राजकुमार शहापूरकर)
