पंढरपूर,माळशिरस विधानसभा मतदार संघात गोपिचंद पडळकर आणि उत्तम जानकर ठरणार ‘गेम चेंजर’

कॉग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपाशी बांधीलकी जोपासणार्‍या गावपुढार्‍यांची मात्र होणार गोची !  

आरक्षणासाठी पेटून उठलेला धनगर समाज सद्यातरी सत्ताधारी आणि विरोधकांच्या ‘आवाक्या बाहेर’?




  
           
 (विशेष आर्टीकल : राजकुमार शहापूरकर)
 असे म्हणतात की दर पाच वर्षांनी धनगर समाज आरक्षणाच्या आपल्या वषानुवर्षाच्या हक्काच्या प्रश्‍नासाठी एका नव्या नेतृत्वाला जन्म देतो,नव्या नेत्याच्या पाठीशी उभा राहतो.गेल्या पन्नास वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणासाठी संघर्ष करत आला आहे.राज्यात धनगड या जमातीचे अस्तीत्वच नसताना धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण केवळ या काल्पनीक जमातीच्या अस्तीत्वास पुढे करीत नाकारले जाते अशी संतप्त भावना या समाजात आहे.धनगर समाजाच्या  आरक्षणाचा मुद्दा पहील्या प्रथम खर्‍या अर्थाने अतिशय समर्थपणे उचलला तो यशवंत सेनेने मात्र या समाजाचे दुदैव म्हणजे आता पर्यंत या समाजाने आरक्षणाच्या आशेने ज्यांच्या खांद्यावर मान टेकवली त्या प्रत्येकांनी सत्ताधार्‍यांकडून मिळालेल्या पदाच्या तुकडयावर आपला मुळ लढा विसरला तर अनेकांनी  सत्ताधार्‍यांची वकीली करण्याचे काम केले.2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूका पुर्वी विद्यमान खा.विकास महात्मे यांनी अतिशय तंत्रशुध्द पध्दतीने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रबोधन व संघर्ष करीत समाजाच्या आशा पल्लवीत केल्या मात्र पुढे त्यांना राज्यसभेवर प्रतिनिधीत्व मिळाल्यानंतर त्यांनी ‘मौनम् सर्वार्थ साधनम् !’ हेच धोरण अवलंबले.
             सुमारे पंधरा वर्षापुर्वी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत पंढरपूरातील जंगी मेळाव्यात ढोल बडवून धनगर समाजाच्या आरक्षनाचे आश्‍वासन देण्यात आले मात्र पुढे या भव्य आणि न भुतो न भविष्यती मेळाव्याचे आयोजक प्रकाश शेंडगे यांचाही पध्दतशीर वापर करुन त्यांना पुढे राजकिय बुध्दीबळाच्या पटलावर वजीराचा थेट प्यादा बनविण्यात आले.चौंडी ता.करमाळा या अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी झालेल्या मेळाव्यात पाच वर्षापुर्वी धनगर समाजाच्या मेळाव्यात विद्यमान मुख्यमंत्री ज्या त्वेषाने धनगर समाजाच्या आरक्षणाबात बोलले  होते त्या भाषणाने ना.राम शिंदे यांना आमदारच नाही तर थेट नामदार बनवले मात्र तेही पुढे पद मिळाल्यानंतर बोटचेपी भुमिका घेवू लागले.पश्‍चिम महाराष्ट्रात नव्याने उदयास आलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांची धनगर समाजातील प्रतिमा लक्षात घेवून सत्ताधार्‍यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढले खरे पण  गेल्या चार वर्षातील घडामोडी व शासनाच्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नाबाबतच्या फसव्या धोरणाचा अंदाज आल्याने गोपिचंद पडळकर हे भाजपाल्या धडा शिकविण्याच्या उद्देशाने आता बाहेर पडले आहेत.राज्याच्या कानाकोपर्‍यात जावून ते धनगर समाजास संघटीत करीत असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.नुकतेच मंगळवेढा तालुक्यातील हन्नूर येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास हजारोंच्या संखेने धनगर समजा बांधव उपस्थित राहीले होते.गोपीचंद पळकर व उत्तम जानकर यांच्या उपस्थितीत संपुर्ण सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपर्‍या मेळाव्यांचे आयोजन करुन समाज जागृती करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे जिल्ह्यातील प्रस्थापीत लोकप्रतिनिधींचे व नेत्यांचे धाबे दणाणले आहे.
    मंगळवेढा तालुक्यात झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यास पक्षभेद विसरुन विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेल्या अगदी प्रस्थपितांच्या सहकारी संस्थेचे पदाधिकारी असलेल्या धनगर समाजाच्या दुसर्‍या फळीतील गावपुढार्‍यांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती.त्यांची हीच भुमिका समाजाला न्याय मिळेपर्यंत ठाम राहणार का की ऐन निवडनूकीच्या काळात ते पुन्हा आपल्या आपल्या प्रस्थापित नेत्यांच्या व पक्षाच्या दावणिला बांधले जाणार हे आगामी विधानसभा निवडणूकीतच दिसून येणार आहे मात्र सद्या तरी धनगर समाजाचे मतदार मोठया संख्येने असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा व माळशिरस विधानसभा मतदार संघात धनगर समाजाची ‘नवी आशा’असलेले गोपिचंद पडळकर व उत्तम जानकर हे नेते गेम चेंजर ठरणार आहेत एवढे मात्र निश्‍चीत !
- राजकुमार शहापूरकर (संपादक: पंढरी वार्ता) 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव